Ad will apear here
Next
‘दिवाळी म्हणजे साहित्य फराळ’

‘दिवाळीच्या आठवणींत रमायला कोणालाही आवडतंच. तशीच मीही रमते ती आमच्याकडील साहित्य फराळाच्या आठवणींमध्ये...’ सांगत आहेत ज्येष्ठ लेखिका-पत्रकार अरुणा अंतरकर... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात
.....

अरुणा अंतरकर
दिवाळी साजरी करण्याचे स्वरूप काळानुरूप बदलले आहे; पण त्याबद्दल तक्रार असायचे कारण नाही. कारण बदल हा अपरिहार्य आहे. आज दिवाळी हा शॉपिंग फेस्टिव्हल झाला आहे. पूर्वी लोकांकडे इतका पैसा आणि अशी घरबसल्या खरेदीची सोयही नव्हती. आजकाल कुटुंबेही लहान झाली आहेत. आपले राहणीमान, जीवनशैली बदलली आहे, तशी दिवाळीही थोडी बदलली आहे; पण तो उत्साह, आनंद कायम आहे. त्यामुळे मी आजही दिवाळी पूर्वीइतकीच एन्जॉय करते. जुन्या काळी, आम्ही लहान असताना भेटवस्तू देण्याचे प्रस्थ नव्हते. तेव्हा लोक घरी फराळाला बोलवायचे. भेटीदाखल फराळ पाठवायचे. आता भेटवस्तू देतात इतकेच.

आमच्या लहानपणी आम्हाला अपूर्वाई असायची ती साहित्य फराळाची. माझे वडील अनंत अंतरकर हे हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांचे संस्थापक संपादक होते. या मासिकांचे दिवाळी अंक काढण्याची जोरदार तयारी चालायची. अर्थात हे काम दोन-तीन महिने आधीच सुरू झालेले असायचे. दिवाळीत वेध लागायचे ते अंक प्रकाशित करण्याचे, बाजारात आणण्याचे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत आम्ही भावंडे या कामात गुंतून गेलेलो असायचो; पण या दिवाळीच्या आठवणींत एक दिवाळी आमच्यासाठी अत्यंत दुःखद आहे. १९६६च्या दिवाळीच्या एक महिना आधी ते आजारी पडले आणि ऐन दिवाळीवेळी ते गेले. हा खूप मोठा धक्का होता. त्यामुळे त्यानंतर दिवाळी साजरी करावीशी वाटली नाही. त्या वर्षी आमच्यापुढे आव्हान होते ते दिवाळी अंकांचे काय होणार याचे. ते प्रकाशित होणार की नाही, याची चर्चा सुरू होती; मात्र अंतरकर कुटुंबाने एकत्र येऊन अंक प्रकाशित करण्याचे ठरवले. सगळ्यांची वये लहान होती तरीही सर्वांनी ध्यास घेतला होता वडिलांचे हे काम पूर्ण करण्याचा. अर्थात सप्टेंबरमध्ये वडिलांनी दिवाळी अंकाची पूर्वतयारी करून ठेवली होती. तरीही ती मूर्त स्वरूपात आणणे, त्याचा दर्जा सांभाळणे हे मोठे आव्हान होते. ते आम्ही सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केले. वेळेत अंक बाजारात आले आणि तेदेखील दर्जा राखून. अनेकांनी कौतुक केले. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनाच्या धक्क्यातून सावरत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड सार्थकी लागली याचा आनंद झाला. आसू आणि हसू या दोन्हीचा अनुभव देणारी अशी ती दिवाळी अविस्मरणीय आहे. ‘जिंदगीभर नही भूलेगी वो बरसात की रात’ याप्रमाणे ‘जिंदगीभर नही भूलेगी वो दिवाली!’

मुंबईत एका दिवाळीत, सोसायटीतील लहान मुलांना लळा लागलेल्या कुत्र्यांच्या छोट्या पिल्लांना नगरपालिकेच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ती पिल्ले परत आणली. त्या वेळी त्या पिल्लांच्या आईचे ओसंडून वाहणारे वात्सल्य आणि मुलांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद आजही विसरू शकत नाही.  काही वर्षांपूर्वी मी मुलुंडमध्ये एका सोसायटीत रहात होते. तिथे दिवाळीच्या काही दिवसच आधी एका कुत्रीने आठ-दहा पिल्लांना जन्म दिला होता. त्या गोंडस पिल्लांचा सोसायटीतील मुलांना खूप लळा लागला होता; पण एक दिवस अचानक महापालिकेची कुत्रे पकडणारी गाडी आली आणि पिल्लांना घेऊन गेली. पिल्लांची आई त्या वेळी तिथे नसल्याने ती वाचली; पण ती परत आल्यानंतर पिल्ले दिसली नाहीत तेव्हा ती सैरभैर होऊन गेली. सोसायटीतील सगळी मुलेही दुःखी झाली होती, रडवेली झाली होती. मला वडिलांकडून साहित्यासोबतच प्राणिप्रेमाचाही वारसा मिळाला असल्याने मलाही त्या पिल्लांचा लळा लागला होता. पत्रकारितेत असल्याने पिल्लांना कुठे नेले आहे त्याची माहिती मी काढली. तेव्हा महालक्ष्मी पाँडला भटकी कुत्री ठेवली जात असत. तीन दिवसांच्या आत ती ओळख पटवून परत आणता येत असत. तीन दिवसात कुणी नेली नाहीत, तर त्यांना मारून टाकले जात असे. मी ओळख काढून तिथे पोहोचले. हरेक प्रयत्नाने ती सर्व पिल्ले सोडवली आणि रेल्वेने ती आठ-दहा पिल्ले कशी आणली ती आमची आम्हाला माहीत; पण ती पिल्ले आम्ही  सोसायटीत घेऊन आलो. त्या वेळी पिल्लांच्या आईने त्यांना बघितल्यानंतर ज्या तऱ्हेने त्यांना चाटले, जवळ घेतले, ते दृश्य आजही डोळ्यासमोरून हलत नाही. मुलांचे चेहरेही आनंदाने फुलले होते. त्यांनी मला फुलांचा गुच्छ दिला आणि खूप टाळ्या वाजवून कौतुक केले. दिवाळीचे लक्ष लक्ष दिवे त्यांच्या डोळ्यात फुललेले दिसले आणि माझी दिवाळी विलक्षण समाधानाने साजरी झाली. 

आमच्यासाठी दिवाळी म्हणजे साहित्य फराळ अधिक मोलाचा असायचा. आमच्या किशोरवयीन काळात दिवाळी अंकातून दर्जेदार साहित्य वाचायला मिळत असे. जी. ए. कुलकर्णी, गो. नी. दांडेकर अशा नामवंत साहित्यिकांचे लेखन अंकातून वाचायला मिळत असे. ती आमच्यासाठी पर्वणी असे. कपडे, फराळ, फटाके यापेक्षा या साहित्य फराळाचे अप्रूप अधिक होते. दिवाळी अंक विकत घेऊन लोक वाचत असत. आता ही प्रथा कमी झाली आहे. वाचनालयातच बरेच दिवाळी अंक बघायला मिळतात. सोने, चांदी, कपडे, अन्य खरेदी करण्यासाठी खूप पैसा खर्च करतात; पण दिवाळी अंक खरेदी करण्याची तयारी नाही. फार थोडे लोक दिवाळी अंक विकत घेतात. ही एक खंत आहे; पण दिवाळी ही दिवाळी आहे. पद्धती बदलल्या असतील पण उत्साह तोच आहे. 

(शब्दांकन : प्राची गावस्कर; व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर) 

(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUDBH
 फारच छान !
जुने दिवस आठवले . पाचोऱ्याला सार्वजनिक वाचनालयात पाहिजे तो अंक मिळवायला सकाळी लौकर जाणे . तो अंक मिळवून पूर्ण वाचणे . वडील ४, ५ अंक विकत घ्यायची परवानगी द्यायचे.
Similar Posts
‘ती दिवाळी मनात पक्की’ ‘तेव्हा दिवाळीत कडाक्याची थंडी असायची. प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं. आता ऋतूही बदलले आहेत आणि कपडे, दागिने, वाहने खरेदीचं अप्रूप राहिलेलं नाही पण तरीही ती दिवाळी मराठी माणसाच्या अंतर्मनात पक्की बसलेली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे .... ‘ आठवणीतली दिवाळी’ या सदरात
‘दिवाळी म्हणजे नात्यांचा उत्सव’ ८८ वर्षांचे चारुदत्त ऊर्फ चारुकाका सरपोतदार म्हणजे पूना गेस्ट हाउसच्या माध्यमातून अनेक कलाकारांशी जिवाभावाचे नाते जोडलेले पुण्यातले बुजुर्ग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मते दिवाळी हा नात्यांचा, नाती दृढ करण्याचा उत्सव आहे. त्यांच्या ‘आठवणीतली दिवाळी’ अशी आहे...  ......... खरे तर माझ्या लहानपणी
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी पुण्यातील सेवानिवृत्त अध्यापक शशिदा इनामदार यांनी त्यांच्या बालपणीच्या (साठ वर्षांपूर्वीच्या), इस्लामपुरातल्या दिवाळीच्या जागवलेल्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language